उमरगा – शहरातील मोमीन मस्जिद जवळील पतंगे रोड परिसरात चारित्र्याच्या संशयातून एका ४५ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माया रमेश शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना १२ जुलै रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी माधव पांडुरंग पाचंगे (वय ४४, रा. हिप्परगाराव, ता. उमरगा) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत माया शिंदे या पतंगे रोड येथील आपल्या राहत्या घरी होत्या. आरोपी माधव पाचंगे याचे मृत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच संबंधातून त्याने १२ जुलै रोजी रात्री ८:३० ते १०:१५ च्या सुमारास माया यांच्या घरी येऊन त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. यातून झालेल्या वादात आरोपीने रागाच्या भरात कशानेतरी गळा आवळून माया शिंदे यांचा खून केला.
घटनेनंतर बराच वेळ उलटूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांच्या मनात शंका आली. यानंतर शवविच्छेदन आणि अंत्यविधी पार पडल्यानंतर मृत महिलेची मुलगी रोहिणी दिपक पाटोळे (वय २४, रा. पुणे) यांनी १४ जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी आरोपी माधव पाचंगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद (गु.र.क्र. ४६२/२०२५) केला आहे. आरोपी पाचंगे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर यापूर्वीही मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडीओग्राफी केली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही वेगाने सुरू केली आहे. या घटनेमुळे उमरगा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.