उमरगा – अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. या सततच्या त्रासाला कंटाळून त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सुंदरवाडी (नाईकनगर) येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुनाम गोपा चव्हाण (रा. नाईकनगर, सुंदरवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनामने १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नाईकनगर शिवारातील डॉ. मालपाणी यांच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
याप्रकरणी संगिता बाळासाहेब पवार (वय ३५, रा. नाईकनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी शंकर मानु राठोड याचे गावातील शारुबाई नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत गुरुनाम चव्हाण हा शारुबाईच्या घरी गेल्याचा राग आरोपी शंकरच्या मनात होता. याच रागातून शंकर राठोड याने गुरुनाम यास कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून त्रास दिला होता.
या मारहाणीमुळे आणि सततच्या त्रासामुळेच गुरुनामने हे टोकाचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मुरुम पोलिसांनी आरोपी शंकर राठोड विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) (आत्महत्येस प्रवृत्त करणे), १०८, ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.