उमरगा – उमरगा शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवली असून, याच गस्तीदरम्यान एका संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. मालमत्तेविरुद्ध गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
उमरगा पोलीस ठाण्याचे पथक २३ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पतंगे हॉस्पिटलजवळ एक व्यक्ती अंधारात संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेली दिसली. पथकाने तात्काळ त्यास हटकून चौकशी केली असता त्याने आपले नाव राम भागवत जाधव (वय ३० वर्षे, रा. कवठा, ता. उमरगा, ह.मु. कुंभारपट्टी, उमरगा) असे सांगितले.
पोलिसांनी इतक्या रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता, त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तो गुन्हा करण्याच्या उद्देशानेच परिसरात फिरत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन, सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.