धाराशिव : शहरातील समतानगर परिसरातील रस्त्याच्या दुरुस्ती तसेच विविध विकासकामांसाठी समता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ति पुजार यांना निवेदन देण्यात आले. अर्धवट सोडलेल्या कामांमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, छत्रपती संभाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाच्या हॉट मिक्स डांबरीकरणाच्या कामास धाराशिव नगर परिषदेने 28 मार्च 2021 रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर देखील ते अद्याप पूर्ण झालेले नाही. विशेषतः जुने टीव्ही सेंटर ते विसर्जन विहीर या मार्गाचा काही भाग पूर्णतः दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे.
याशिवाय, 2021-22 मध्ये नगर परिषदेने नवीन विसर्जन विहीर बांधण्यास आणि त्यापासून एचडीएफसी बँकेपर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेतले होते. यासाठी प्रशासकीय मान्यता आणि वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, हे काम देखील अर्धवट स्थितीत सोडण्यात आले आहे. विसर्जन विहीर ते एचडीएफसी बँक दरम्यानचा काँक्रीट रस्ता अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे नागरिकांना खड्डे आणि धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
नगर परिषदेने दिलेल्या मंजुरीनंतर देखील कामे अर्धवट सोडली जात असल्याने प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी. 15 मार्च 2025 पूर्वी ही दोन्ही कामे सुरू करण्याचे आदेश नगर परिषदेला द्यावेत, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा समतानगरवासीयांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. तसेच, यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे, कैलास पानसे, कुमार पारे, अतुल पाटील, नारायण पाटील, एच. एम. लोमटे, रामचंद्र जोशी, बिभीषण माळी, एस. एस. जगदाळे, सौ. सुरेखा गोकुळ कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.