धाराशिव: काल, मंगळवारी रात्रीपासून धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून, यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर चाललेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत दाणादाण उडवली. लोहारा, कळंब, भूम, वाशी आणि उमरगा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला असून, अनेक ठिकाणी पत्र्याची घरे जमीनदोस्त झाली आहेत, ज्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
वीज यंत्रणा कोलमडली, वाहतूक विस्कळीत
वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत विजेचे खांब उन्मळून पडले आहेत किंवा वाकले आहेत, तर विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. भूम शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शहरातील शिवाजीनगर भागात एका विहिरीतील झाड उन्मळून पडल्याने विद्युत वाहिनी तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. पंचायत समिती कार्यालयाच्या गेटजवळ व शाहूनगर भागातही झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती.
शिरपूरमध्ये घरांची पडझड, पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी
लोहारा तालुक्यातील मौजे शिरपूर परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली, विद्युत खांब वाकले आणि अनेकांच्या घरातील टिनपत्रे उडाली. काढणीला आलेल्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी भगवान भोसले, विनोद कदम, शिवाजी कदम, माधव कदम, राम कांबळे, कृष्णा काळे, सोपान कदम, पांडुरंग कदम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कळंब तालुक्यातही दाणादाण; आंबा, कांद्याला फटका, घरांत पाणी
कळंब तालुक्यातील डिग्रस महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरातील आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली व घरांची पडझड झाली. विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गुरेवाडी शिवारातही काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकात पाणी साचल्याने कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
येडेश्वरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ
कळंब तालुक्यातील प्रसिद्ध येडेश्वरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची वादळी वाऱ्यामुळे मोठी तारांबळ उडाली. दर्शनासाठी मोठी गर्दी असतानाच सोसाट्याचा वारा आणि पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांची धावपळ उडाली. अनेकांनी मंदिराच्या परिसरातील दुकाने व हॉटेलमध्ये आश्रय घेतला.
पुढील पाच दिवस सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने जिल्ह्यात आगामी पाच दिवस जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
आज सकाळपासूनही जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून, हा पाऊस दिवसभर सुरू राहण्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.