धाराशिव: घराचे दार वाजवून आत प्रवेश करत चार अज्ञात चोरट्यांनी घरातील वृद्धाला मारहाण करून, चाकूचा धाक दाखवत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची खळबळजनक घटना उपळा (मा.) (ता. जि. धाराशिव) येथे घडली. चोरट्यांनी जाताना संपूर्ण कुटुंबाला घरात कोंडून पोबारा केला. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालिंग रामलिंग शेटे (वय ६३, रा. उपळा मा., ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील असा की, फिर्यादी महालिंग शेटे हे आपल्या कुटुंबासह राहत्या घरी असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराचे दार वाजवले. यावेळी शेटे यांच्या आईने दार उघडले असता, चारही इसमांनी बळजबरीने घरात प्रवेश केला. त्यांनी घरात घुसताच फिर्यादी महालिंग शेटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
चोरट्यांनी शेटे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लोखंडी पाईप आणि चाकूचा धाक दाखवून भीती घातली. त्यानंतर घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, पितळी व तांब्याची भांडी, देवघरातील देवाच्या मूर्ती आणि रोख रक्कम असा एकूण २,९०,००० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पळून जाण्यापूर्वी चोरट्यांनी शेटे आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरातच कोंडून ठेवले.
या घटनेनंतर महालिंग शेटे यांनी गुरुवारी (दि. १८) धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) (दरोडा/लूटमार) आणि ३३२ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






