येरमाळा – जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील उपळाई येथे घडली आहे. या गंभीर घटनेत तरुण भाजून जखमी झाला असून, याप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर येरमाळा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार फुलचंद बांगर (वय ३५, रा. उपळाई, ता. कळंब) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास उपळाई येथे घडली. आरोपी धनाजी सायसराव मुंढे, बापूराव नवनाथ मुंढे आणि दत्तात्रय सायसराव मुंढे (सर्व रा. उपळाई) आणि फिर्यादी राजकुमार बांगर यांच्यात जुन्या आर्थिक व्यवहारावरून वाद होता.
घटनेच्या दिवशी आरोपींनी राजकुमार बांगर यांना घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गाठले. तिथे त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी बांगर यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ (पेट्रोल/डिझेल समवर्गीय) टाकून त्यांना पेटवून दिले. यामध्ये बांगर गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर जखमी राजकुमार बांगर यांनी मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (धोकादायक शस्त्राने किंवा साधनाने गंभीर दुखापत करणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






