बेंबळी – जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २० वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी घडली होती.
याप्रकरणी सदाशिव संतोष थिटे (वय २०, रा. वाडीबामणी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव हे १ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास वाडीबामणी येथे गावातीलच खंडू मोटे यांच्या घरासमोर होते. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना अडवले.
आरोपींनी सदाशिव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून, बेंबळी पोलिसांनी रोहन बालाजी शितोळे, सुरज आप्पासाहेब पवार, संस्कार विठ्ठल शितोळे, अशोक नानासाहेब जाधव, सौदागर दत्तात्रय पवार, खंडू झुंबर मोटे आणि ओंकार गोरोबा शितोळे (सर्व रा. वाडीबामणी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.