वाशी : जमिनीचा वाद कोर्टात नेल्याचा राग मनात धरून एका शेतकरी कुटुंबाने दुसऱ्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकांवर विषारी औषध फवारून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना भूम तालुक्यातील निपाणी येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुस्तफा महेबुब पठाण (वय ५८, रा. निपाणी, ता. भूम) हे निपाणी शिवारातील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीवर शेती करतात. याच जमिनीवरून त्यांचा गावातीलच काळे कुटुंबासोबत वाद सुरू होता. पठाण यांनी या जमिनीच्या मालकी हक्कासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.
याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी १९ जुलैच्या रात्री ते २० जुलैच्या सकाळच्या दरम्यान, पठाण यांच्या शेतात घुसून उभ्या पिकांवर औषध फवारणी केली. यामध्ये त्यांचे ३० एकर सोयाबीन, ३ एकर उडीद, १ एकर मूग आणि ४ एकर कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. या फवारणीमुळे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पठाण यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर मुस्तफा पठाण यांनी २७ जुलै रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविद्या अंकुश काळे, उशा अविद्या काळे, अतुल्या अंकुश काळे, चिवताई अतुल्या काळे, नेमचंद अंकुश काळे, सहेंद्र अंकुश काळे, अंकुश अकड्या काळे, लताबाई अंकुश काळे, आणि कारभारी अविद्या काळे (सर्व रा. निपाणी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.