वाशी : तालुक्यातील दसमेगाव शिवारात पाईप उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हनुमंत अशोक उघडे (वय ३७, रा. दसमेगाव) हे दि. १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास आपल्या शेतात होते. यावेळी आरोपी लिंबराज मदन कुलकर्णी (रा. दसमेगाव) याने फिर्यादीच्या पत्नीला पाईप उचलण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पत्नीला शिवीगाळ करत असल्याचे पाहून हनुमंत उघडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी लिंबराज कुलकर्णी याने त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, रागाच्या भरात त्याने जवळ असलेल्या कोयत्याने हनुमंत उघडे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर हनुमंत उघडे यांनी दि. १३ जुलै २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी लिंबराज मदन कुलकर्णी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.