वाशी : शेतातील पवनचक्कीचे पोल वाकवल्याच्या संशयावरून एका ३७ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लोखंडी गजाने आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील शेंडी येथे घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत नवनाथ मोरे (वय ३७, रा. शेंडी, ता. वाशी) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी यासंदर्भात वाशी पोलिसांत फिर्याद दिली आहे. राजकुमार श्रीनिवास मोरे आणि अनंता शहाजी मोरे (दोघे रा. शेंडी, ता. वाशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास शेंडी येथील कोंडीबा हांडगे यांच्या शेतातील पाण्याच्या हौदाजवळ आणि शेंडी पाटीजवळ हा प्रकार घडला. फिर्यादी भारत मोरे यांनीच शेतातील पवनचक्कीचे पोल वाकवले आहेत, असा संशय आरोपींना होता. याच कारणावरून दोन्ही आरोपींनी भारत मोरे यांना गाठले. सुरुवातीला त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात लोखंडी काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर भारत मोरे यांनी १९ फेब्रुवारी रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रथम खबर (FIR) दिली. त्यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी आरोपी राजकुमार मोरे आणि अनंता मोरे यांच्याविरुद्ध नवीन फौजदारी कायदा म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.





