वाशी : सोने आणि पैशाच्या कारणावरून पत्नीसह चौघांनी फोन व व्हॉट्सॲपवरून दिलेल्या त्रासाला कंटाळून एका ३६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी शिवारात २१ मार्च २०२५ रोजी घडली होती.
याप्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पत्नीसह चौघांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत राहुल माणिक नांगरे (वय ३६, रा. सारोळा मांडवा, ता. वाशी) यांनी दि. २१ मार्च २०२५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पिंपळगाव लिंगी शिवारातील माणिक नांगरे यांच्या मालकीच्या कुक्कटपालन शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेप्रकरणी, मयताचे वडील माणिक महादेव नांगरे (वय ६६) यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मयत राहुलची पत्नी सोनाली राहुल नांगरे (रा. सारोळा मांडवा, ह.मु. सोलापूर), तसेच वसंत पवार, तेजश्री वसंत पवार आणि प्रसाद वसंत पवार (सर्व रा. सोलापूर) यांनी संगनमत करून सोने व पैशाच्या कारणावरून राहुल यांना फोनद्वारे व व्हॉट्सॲपद्वारे सतत त्रास दिला.
या त्रासाला कंटाळूनच राहुल नांगरे यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.






