वाशी – शिवीगाळ करून लोखंडी रॉड व वायरने मारहाण केल्याच्या त्रासाला कंटाळून वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत किसन थोरात (वय ४०, रा. गोजवाडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना दि. १९ ऑक्टोबर ते दि. २२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान गोजवाडा येथील बावी रोडवरील अंकुश वाघमारे यांच्या शेतात घडली. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत चंद्रकांत थोरात यांच्या पत्नी स्वाती चंद्रकांत थोरात (वय ३५) यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी अरुण उर्फ पिण्या दत्तात्रय थोरबोले, अशोक उर्फ भाऊसाहेब दत्तात्रय थोरबोले, आणि दत्तात्रय सुखदेव थोरबोले (सर्व रा. गोजवाडा) यांनी मयत चंद्रकांत यांना शिवीगाळ केली.
तसेच, आरोपींनी चंद्रकांत यांना लोखंडी रॉडने व वायरने मारहाणही केली. या सततच्या त्रासाला कंटाळूनच चंद्रकांत थोरात यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरून, वरील तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.






