वाशी : भूम-पार्डी रोडवर कत्तलीसाठी ११ जर्सी गायींची आयशर टेम्पोमधून निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना वाशी पोलिसांनी गुरुवारी (दि. ३ एप्रिल २०२५) सायंकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गायी आणि वाहन असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मनोज ज्ञानदेव साळवे (वय ४०) आणि वसीम खाजा कुरेशी (वय ३०, दोघे रा. आंबेडकर नगर, राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास भूम ते पार्डी जाणाऱ्या रोडवर पार्डी फाट्याजवळील पुलाजवळ वाशी पोलिसांना आयशर टेम्पो (क्र. एमएच १४ डीएम ६२९२) संशयास्पदरित्या आढळून आला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, त्यात गोवंशीय जातीच्या ११ जर्सी गायी (अंदाजे किंमत ५५,००० रुपये) चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत निर्दयतेने कोंबून भरलेल्या आढळल्या. या गायी कत्तली करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले.
वाशी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि टेम्पोसह गायी जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ५५ हजार रुपये आहे.
याप्रकरणी, वाशी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम आणि प्राण्यांचे परिवहन नियमांतील विविध कलमांन्वये (कलम 5, 5(अ), 5(ब), 9(ब), 11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1), 11(1)(अ), 11(एच), 11(1)(एफ), 11(1)(आय) सह कलम 47, 54, 56 प्राण्यांचे परिवहन नियम) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.