वाशी : तालुक्यातील एका गावातून ३० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चार तरुणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी (नाव व गाव गोपनीय) हिला दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान गावातीलच चार तरुणांनी एका चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून अज्ञातस्थळी नेले. त्या ठिकाणी आरोपींपैकी एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी इतर तीन तरुणांनी पीडितेला दिली. या भयंकर प्रकारानंतर पीडितेने गुरुवारी, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४० (३),(४), १४२, ६४, ३५१ (२) (३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.