धाराशिव : तालुक्यातील येडशी येथे २००५ साली कौटुंबिक आणि आर्थिक वादातून आपल्या चुलत्याची तलवारीने हत्या करून मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या पुतण्याला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या त्याच्या भावाची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालामुळे २०१८ पासून गाजत असलेल्या या खुनाच्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे.
काय आहे प्रकरण?
सहाय्यक शासकीय अभियोक्ता अॅड. पंडित के. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येडशी येथील भास्कर रंगनाथ नागटिळक (वय ६०) यांची ७ नोव्हेंबर २०१५ रोजी मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. भास्कर यांचा पुतण्या महेंद्र वामन नागटिळक याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर बोलावले आणि तलवारीने वार करून खून केला. घटनेच्या वेळी भास्कर यांच्या पत्नीने घरातून दरवाजा बंद केला होता, मात्र महेंद्रने लाथा मारून दरवाजा उघडला आणि त्यांना रामलिंग अभयारण्यात नेऊन तारेने झाडाला बांधून ठेवले. ‘मला सोमनाथ नागटिळकने (महेंद्रचा भाऊ) खून करण्यासाठी सुपारी दिली आहे,’ असे महेंद्रने म्हटल्याचेही समोर आले होते.त्यानंतर महेंद्रने भास्कर यांच्या मृतदेहाचे चार तुकडे करून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते.
पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट परिस्थितीत तपास करत जंगलातून मृतदेहाचे चारही तुकडे शोधून काढले आणि एकत्र करून पंचनामा केला. तपासात घटनास्थळावरील रक्ताने माखलेली माती, मृतदेह ओढून नेताना पडलेले रक्ताचे नमुने, मृताचे कपडे (अंडरवेअर), सापडलेले सीम कार्ड, फेविकॉलचे कव्हर आणि मृतदेह गुंडाळलेली रजई यांसारखे महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले. पोलिसांनी सादर केलेले हेच पुरावे महेंद्र नागटिळक याला शिक्षा सुनावण्यासाठी निर्णायक ठरले.
न्यायालयाचा निकाल
मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाने महेंद्र वामन नागटिळक याला हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, त्याचा भाऊ सोमनाथ नागटिळक याच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे १० वर्षांपूर्वी घडलेल्या आणि जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या हत्याकांडाचा निकाल लागला आहे.