धाराशिव – क्षुल्लक कारणावरून वाद किती विकोपाला जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथे समोर आले आहे. मावस भावासोबतचे भांडण सोडवल्याचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्यासह दोन भावांवर कोयता आणि काठीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संस्कार विठ्ठल शितोळे (वय १९, रा. वाडीबामणी) यांनी आरोपींच्या मावस भावासोबत झालेले एक भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली होती. याचाच राग मनात धरून १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून संस्कार यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला.
घरात घुसल्यानंतर आरोपी सदाशिव संतोष थिटे, कार्तिक सत्यवान थिटे, सागर संतोष बामणकर, संदीप संतोष बामणकर, मल्लीनाथ सोमनाथ लईतवार, संतोष लक्ष्मण थिटे आणि सत्यवान लक्ष्मण थिटे (सर्व रा. वाडीबामणी) यांनी फिर्यादी संस्कार शितोळे व त्यांच्या चुलत भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, कोयता व काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, या घटनेबद्दल वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या हल्ल्यानंतर संस्कार शितोळे यांनी २ सप्टेंबर रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध घरात घुसून मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे याअंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ३५२, ३५१(२)(३), ३३३, १८९(२), १९१(२)(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.