वाशी – ‘आमच्या माणसाला वाकडे का बोलतो?’ असा जाब विचारत सहा जणांच्या टोळक्याने एका ३४ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि फायबरच्या खुर्चीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना वाशी शहरातील वाशी फाटा येथे घडली. आरोपींनी तरुणाला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना २२ एप्रिल रोजी घडली असली तरी, याबाबतचा गुन्हा २५ एप्रिल रोजी वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विशाल वसंतराव नाईकवाडी (वय ३४ वर्षे, रा. जगदाळे मामा कॉलेज समोर, वाशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते वाशी फाटा येथील रोडवर होते. यावेळी आरोपी तुषार कवडे, अजय भोसले, रोहित जगताप आणि त्यांचे इतर तीन अनोळखी साथीदार (सर्व रा. वाशी) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला अडवले.
‘आमच्या माणसाला वाकडे बोलतो का?’ असे म्हणत आरोपींनी विशाल नाईकवाडी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने आणि जवळच पडलेल्या फायबरच्या खुर्चीने जबर मारहाण केली. या मारहाणीत विशाल नाईकवाडी गंभीर जखमी झाले. आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर तीन दिवसांनी, २५ एप्रिल रोजी विशाल नाईकवाडी यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तुषार कवडे, अजय भोसले, रोहित जगताप आणि इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वाशी पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.