वाशी: वाशी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यांनी आता आपला मोर्चा कंपन्यांचे साहित्य आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांकडे वळवला आहे. वाशी पोलीस ठाण्यात एकाच दिवशी चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये कंपनीचे १ लाख २० हजारांचे साहित्य आणि शेतकऱ्यांच्या २७ हजार रुपयांच्या पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याची नोंद झाली आहे.
दसमेगाव येथे जनरेटरची तोडफोड; १ लाख २० हजारांचे नुकसान
वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील गट क्र. १८५ मध्ये असलेल्या कंपनीच्या पॉईंट क्र. डीके ०२ वरून चोरट्यांनी जनरेटरचे २४ कॉपर केबल आणि कन्व्हर्टर पॅनेल लंपास केले. एवढेच नाही तर चोरट्यांनी जनरेटरची तोडफोड करून कंपनीचे अंदाजे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. ही घटना २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी रोशन सुरेश निकम (वय ३५ वर्षे, मूळ रा. मालेगाव जि. नाशिक, सध्या रा. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी २६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) आणि ३२४(५) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फक्राबाद शिवारात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारींची चोरी
चोरीच्या दुसऱ्या घटनेत मांजरा नदी आणि फक्राबाद शिवार परिसरातून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी पळवण्यात आल्या आहेत. यामध्ये रवींद्र गाळू शिंदे यांची ५ एचपीची सोलर मोटार, चंद्रकांत शिंदे यांच्या शेतातील ३ एचपीची लक्ष्मी कंपनीची पाणबुडी मोटार आणि बाळासाहेब भराटे यांची ५ एचपीची पाणबुडी मोटार असा एकूण २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही घटना २४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ६ ते २५ फेब्रुवारीच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी पारा (ता. वाशी) येथील रवींद्र गाळू शिंदे (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २६ फेब्रुवारी रोजी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
-
घटना १: दसमेगाव येथे कंपनीच्या जनरेटरची तोडफोड व कॉपर केबल चोरी (नुकसान: ₹ १,२०,०००).
-
घटना २: फक्राबाद शिवार व मांजरा नदीवरून ३ शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारींची चोरी (नुकसान: ₹ २७,०००).
-
पोलीस ठाणे: दोन्ही गुन्हे वाशी पोलीस ठाण्यात दाखल.
-
दाखल कलमे: भा.न्या.सं. ३०३(२), ३२४(५)







