धाराशिव : एका बाजूला आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचा खमंग सुवास अजूनही जनतेच्या नाकात घोळतोय, तर दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्यावरही संशयाचे ढग दाटले आहेत. सत्यशोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी डॉ. ओम्बासे यांच्यावर आरोप केला आहे की, साहेबांनी बोगस नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र लावून सरकारी नोकरीत एंट्री मारली आहे.
साहेबांनी मात्र लगेच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली, “होय, माझे वडील प्राध्यापक होते, पण आई गृहिणी होती बरं का! आणि उत्पन्नाचं काय, सुरुवातीला जास्त होतं, म्हणून चार वेळा ओपन मधून परीक्षा दिल्या. नंतर उत्पन्न कमी झालं, मग ओबीसीचा फायदा घेतला. परीक्षेला काय, सगळं जमवायला लागतं!”
मात्र इथे खरी धमाल म्हणजे दोन पत्रकारांची एन्ट्री. साहेबांचं म्हणणं आहे की, हे दोन पत्रकार, बरेचसे ‘नारदाचे शिष्य’ असावेत, यांना काही माहिती मिळाली की, त्यांनी साहेबांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला! “माहिती उघड करू, तुम्हाला बदनाम करू!” अशी धमकी दिली, असं साहेबांनी सांगितलं. पण साहेब काही कमी नाहीत! त्यांनी त्यांना म्हटलं, “जास्त शिळं नका उखळू, तक्रार करायची असेल तर करा, नाही तर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन!”
आता सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न – हे दोन ‘धाराशिवी’ पत्रकार कोण? जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांची नावं सांगावी की नाही? की त्या दोन पत्रकारांच्या नावाच्या गोष्टी फक्त धाराशिवच्या कट्ट्यावरच रंगतील? पुढच्या भागात या रहस्यमय पत्रकारांच्या शोधात – ‘धाराशिवचे शेरलॉक होम्स!’