उमरगा: गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गोवा आणि तामिळनाडूपर्यंत जाऊन कारवाई करणाऱ्या उमरगा पोलिसांकडून कराळी गावातील विद्यार्थ्यांवर तलवारीचा धाक दाखवून मारहाण करणाऱ्या दोन गावगुंडांना मात्र आठवडाभर झाला तरी अटक करण्यात आलेली नाही. या निषेधार्थ सोमवारी (दि. ३) शेकडो ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली.
घटनेचा तपशील
कराळी येथील आगजाप्पा देवस्थानातील गुरुकुलात तेजसनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते बारा विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात. २७ जानेवारीला रात्री महाराज लहान मुलांना घेऊन कीर्तनासाठी मुळज येथे गेले होते. त्या वेळी आदित्य व गौरव हे देवस्थानात झोपलेले असताना, रात्री नऊच्या सुमारास अमोल जमादार आणि नागराज जमादार यांनी मंदिराचा दरवाजा लाथ मारून उघडायला लावला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गळ्यावर तलवार ठेवून अपशब्द वापरले आणि मारहाण केली.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी २८ जानेवारीला शोभा काशिनाथ वडदरे यांच्या फिर्यादीवरून अमोल भरत जमादार व नागराज बापू जमादार (रा. कराळी) यांच्यावर गुन्हा नोंदवला. मात्र, आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही.
ग्रामस्थांच्या संतापाची कारणे
गुरुकुलातील विद्यार्थी तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षणासाठी जात असताना, आरोपी अमोल याचा भाऊ सचिन जमादार आणि इतर नातेवाईक गुन्हा मागे घेण्याचा दबाव टाकत विद्यार्थ्यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे गुरुकुलातील सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ दहशतीखाली असून, पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
बेमुदत रास्ता रोकोचा इशारा
ग्रामस्थांनी पोलिसांना आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका
ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्यासमोर महिला, पुरुष आणि विद्यार्थी यांनी आपली कैफियत मांडली. संतप्त जमावाला शांत करताना शेलार यांनी चार दिवसांत आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच कराळी गावात शांतता राखण्यासाठी पोलीस फिक्स पॉईंट तैनात करण्याचे निर्देशही दिले. त्यांच्या आश्वासनानंतर जमाव शांत झाला.
पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
आता ग्रामस्थांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. चार दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास, कराळी ग्रामस्थ वारकरी समाजासह तीव्र आंदोलन छेडण्यास सज्ज आहेत.