धाराशिव जिल्ह्यात सध्या एक आगळं-वेगळं संकट आलंय – गाढवांचा तुटवडा!
होय, यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण धाराशिव जिल्ह्यात गाढव मिळणं हे आता चांद्रयान-४ चं यश मिळवण्याइतकंच अवघड झालंय.
टी-२२ वाघाचा आणि गाढवांचा संबंध काय?
तर किस्सा असा आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर जंगलातून आलेला टी-२२ वाघ धाराशिव जिल्ह्यात येऊन तीन महिने झालेत. पण वन विभागाचे साहेब त्याला पकडू शकले नाहीत.
सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मनोज जाधव यांनी धमकी दिली होती की, “१७ मार्चपर्यंत वाघ न पकडल्यास वन अधिकाऱ्यांना गाढव भेट देऊ!”
आधी बेशरम, आता गाढव!
यापूर्वी जाधव यांनी वन अधिकाऱ्यांना “बेशरम झाड” भेट दिलं होतं. आता मात्र त्यांना गाढव भेट द्यायचंय. पण प्रॉब्लेम असा की, गाढव मिळतंच नाहीये! गेली दोन दिवस झालेत, पण धाराशिवात गाढव मिळालं नाही.
बार्शीच्या गाढवखोरांचा शोध
गाढव शोधता शोधता थकल्यावर, जाधवांनी बार्शीला फोन लावला.
फोन उचलणाऱ्या माणसाने म्हटलं, “ढेपे साहेबांना विचारा, त्यांना धाराशिवमधील तीन गाढवे माहित आहेत!”
समोरच्या माणसाच्या या उत्तरानं सगळं चित्रच बदललं!
पत्रकारितेतील काही लोकांनी लगेच अंदाज बांधायला सुरुवात केली –
“तीन गाढवे? कोण आहेत ती?”
कोणी दोन गाढवांच्या नावावर ठाम राहिलं, पण तिसरं कोण हे कळेचना!
गाढवांची चर्चा पसरली धाराशिव, सोलापूर, बीड आणि लातूरपर्यंत!
धाराशिव जिल्ह्यापुरतं ही चर्चा मर्यादित राहिली नाही. सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा अंदाज बांधायला सुरुवात केली.
कोणी म्हणालं – “अरे, त्या तिघांचीच चर्चा आहे!”
तर कोणी म्हणालं – “नाही, दोन गाढव पक्की, तिसरं कोण?”
गाढवांच्या ओळखीचा खेळ!
गाढव मिळेल का मिळेल, हे कळणार नाही, पण आता जिल्ह्यात एक वेगळीच स्पर्धा सुरू झालीय –
“गाढव कोण?”
लोक आपापल्या परीने गाढवांचा शोध घेतायत. काहींनी तर गाढवांचे फोटोसुद्धा काढून पोस्ट करायला सुरुवात केलीय.
आता वाघ कधी सापडेल कोण जाणे, पण धाराशिवात गाढवांचा शोध संपता संपेना!
तात्पर्य:
गाढव शोधायचं तर जंगलात नव्हे, पत्रकारांच्या गप्पांमध्ये शोधा!