तुळजापूर – श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील एका भाविकाचा खिसा कापून १५ हजार रुपये लंपास करणाऱ्या एका सराईत महिलेस तुळजापूर पोलिसांनी काही तासांच्या आत अटक केली आहे. तिच्याकडून चोरीच्या रकमेपैकी ६,२४० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी रोहीत गणपत तावरे (वय २६, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रविना चंद्रकांत काळे (वय २१, रा. बालाजी नगर, भूम) असे अटक केलेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहीत तावरे हे गुरुवारी, १० जुलै रोजी दुपारच्या सुमारास श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील यज्ञ मंडप परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत संशयित आरोपी रविना काळे हिने शिताफीने रोहीत तावरे यांच्या खिशातील १५,३०० रुपयांची रोकड चोरली.
खिशातील पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच रोहीत तावरे यांनी तातडीने तुळजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवली. काही तासांतच संशयित आरोपी रविना काळे हिला ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी केली असता, तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या रकमेपैकी ६,२४० रुपये जप्त केले आहेत.
याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.