धाराशिव: येथील माणिक चौकातील एका मालमत्तेवर कर्जदार महिलेने महसूल विभागाने लावलेले कुलूप तोडून बेकायदेशीरपणे पुन्हा ताबा मिळवल्याची घटना घडली आहे. महसूल यंत्रणेने जप्त केलेल्या या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी कर्जदार महिलेविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सविता विश्वनाथ विभुते (वय ४०, रा. एमआयडीसी, धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, माणिक चौक येथील एक मालमत्ता महसूल यंत्रणेने कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत ताब्यात घेतली होती. मात्र, या मिळकतीची कर्जदार असलेल्या संगीता दीपक पवार (रा. माणिक चौक, धाराशिव) यांनी १० जुलै २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तोडले.
आरोपी पवार यांनी कुलूप तोडून, संस्थेची पाटी उपटून टाकली आणि घरामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून मालमत्तेचा ताबा घेतला. या घटनेनंतर फिर्यादी सविता विभुते यांनी १४ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संगीता पवार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(४) नुसार (शासकीय अधिकाऱ्याने जप्त केलेल्या मालमत्तेचा अपहार) गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.