धाराशिव – धाराशिव शहरातील बस स्थानकात सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधून ४५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १ मे) दुपारी घडली असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजवाना सत्तार शेख (वय ३६ वर्षे, रा. जुना बस डेपो, धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्या १ मे २०२५ रोजी दुपारी १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास धाराशिव बस स्थानकातून सोलापूर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील ४५,००० रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
या घटनेनंतर रिजवाना शेख यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
वाशी तालुक्यातील पवनचक्कीतून दीड लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
वाशी – वाशी तालुक्यातील यशवंतडी शिवारातील एका खासगी कंपनीच्या पवनचक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी तांब्याची तार (कॉपर वायर) आणि इतर साहित्य असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ ते २४ एप्रिल दरम्यान घडली असून, याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंतडी शिवारात (ता. वाशी) असलेल्या रिनीव पॉवर कंपनीची पॉईंट क्रमांक ३४८ ही पवनचक्की आहे. दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २४ एप्रिल २०२५ रोजीच्या पहाटे १ वाजेच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने या पवनचक्कीमध्ये प्रवेश करून आतून ४३० फूट लांबीची कॉपर वायर (अंदाजे किंमत १,१०,००० रुपये), आतमध्ये बसवलेला सेन्सर लॉक व इतर साहित्य असा एकूण १,५०,००० रुपये किमतीचा माल चोरून नेला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर, कंपनीचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे लिंबराज विठोबा हाके (वय ४२ वर्षे, रा. यशवंतडी, ता. वाशी) यांनी १ मे २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लिंबराज हाके यांच्या फिर्यादीवरून, वाशी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) (चोरी) आणि कलम ३२४(३) (रात्रीच्या वेळी घरफोडी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.