तुळजापूर: तुळजापूर शहरातील नवीन बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून श्री तुळजाभवानी मंदिर परिसर आणि बस स्थानक परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाही पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. पोलीस ‘मूग गिळून गप्प’ बसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा सुरज गवळी (वय २७ वर्षे, रा. तांबरी विभाग, ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्या तुळजापूर येथील नवीन बस स्थानकावर बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी शिल्पा गवळी यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ४०,००० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले.
याप्रकरणी शिल्पा गवळी यांनी दि. २३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून, तुळजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, ऐन उत्सव काळात आणि त्यानंतरही तुळजापूर शहर, बस स्थानक आणि मंदिर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, पोलिसांना अद्याप चोर सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.






