धाराशिव: सोलापूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोराने महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९५,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना धाराशिव बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लता भारत चौधरी (वय ४०, रा. कारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) या त्यांच्या मुलीसह भाग्यश्रीसह ३० जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास धाराशिव बसस्थानकात आल्या होत्या. सोलापूरकडे जाण्यासाठी दुपारी २:३० वाजता लागलेल्या जालना-सोलापूर बसमध्ये चढत असताना खूप गर्दी होती.
बसमध्ये चढताना कोणीतरी पाठीमागून पर्सला धक्का देत असल्याचे लता चौधरी यांना जाणवले, मात्र गर्दीमुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्यांनी पर्स पाहिली असता, पर्सची चेन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पर्स तपासली असता, त्यात ठेवलेले पैसे आणि दागिने गायब होते.
या घटनेनंतर, तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बसची तपासणी केली, परंतु काहीही सापडले नाही. अखेर लता चौधरी यांनी ३१ जुलै २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
चोरीला गेलेल्या मालमत्तेचा तपशील:
- रोख रक्कम: ६७,००० रुपये (५०० रुपयांच्या १३० नोटा आणि २०० रुपयांच्या १० नोटा)
- सोन्याचे दागिने: एकूण २८,५०० रुपये किमतीचे
- ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट (किंमत १२,५०० रुपये)
- २ ग्रॅम वजनाचे कानातील फुलके (किंमत ९,५०० रुपये)
- १ ग्रॅम वजनाची कानातील बाली (किंमत ३,२५० रुपये)
- १ ग्रॅम वजनाचा गळ्यातील बदाम (किंमत ३,२५० रुपये)
या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत एफआयआर क्रमांक ०२६४/२०२५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नितीन संभाजी सुरवसे करत आहेत.