तुळजापूर |आळंदीहून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या एका ५० वर्षीय वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. उषा अशोक व्यवहारे (वय ५०, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी, ३ जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
सिंदफळ गावातून दरवर्षी सुमारे १०० वारकरी महिला देहू-आळंदी येथून पायी वारी करत आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. मृत उषा व्यवहारे यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी सिंदफळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.