तामलवाडी: सोलापूर-तुळजापूर रोडवर पहाटेच्या वेळी पती आणि मुलासोबत कारने प्रवास करणाऱ्या एका पुणे येथील महिलेला अडवून, तिच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना माळुंब्रा शिवारात देवराज हॉटेलजवळ घडली.
याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजाक्ता अनिरुद्ध सुर्यवंशी (वय २१ वर्षे, रा. रामबाग कॉलनी, पुष्पनगरी अपार्टमेंट, कोथरुड, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी प्रजाक्ता सुर्यवंशी या त्यांचे पती व मुलगा यांच्यासोबत त्यांच्या वॅगनार कार (क्र. एमएच १२ एस यु १७७१) मधून प्रवास करत होत्या.
त्यांची गाडी सोलापूर-तुळजापूर रोडवर माळुंब्रा शिवारातील देवराज हॉटेलच्या पुढे आली असता, चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. या व्यक्तींनी फिर्यादी प्रजाक्ता यांच्या गळ्यातील पावणे तीन तोळे वजनाचे (अंदाजे ७०,००० रुपये किंमत) सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
घडलेल्या प्रकारानंतर प्रजाक्ता सुर्यवंशी यांनी तात्काळ तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून, पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.






