धाराशिव : शहरातून प्रवास करणाऱ्या एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी घडली असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या राजेश पांढरे (वय २५, रा. तांबरी विभाग, धाराशिव) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या बुधवारी कोळेवाडी येथे जाण्यासाठी धाराशिव बसस्थानकातून धाराशिव-मुरुड बसमध्ये बसल्या होत्या. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा साधत अज्ञात व्यक्तीने अतिशय शिताफीने विद्या पांढरे यांच्या पर्समधील ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने आणि ३,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ३९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. बसमधून उतरल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
घटनेनंतर विद्या पांढरे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आता बसमधील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत.