परंडा – आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून होणाऱ्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून एका ३१ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील डोंजा येथे घडली आहे. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताई सुखदेव काळे (वय ३१, मूळ रा. कार्ला, ता. परंडा, सध्या रा. डोंजा) असे मयत महिलेचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि काळू बाशा शिंदे (वय ३२, रा. कार्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी खंडेराय शांतीकुमार लांडगे (रा. जाकेपिंपरी, ता. परंडा) आणि महेश अशोक सुर्यवंशी (रा. बंगाळवाडी, ता. परंडा) यांनी ताई काळे यांना आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून सातत्याने त्रास दिला. या दोघांच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून ताई काळे यांनी दिनांक २८ डिसेंबरच्या रात्री १० वाजल्यापासून ते २९ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजेच्या दरम्यान डोंजा येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
दोघांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर काळू शिंदे यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ७५(१)(२), ३५१(२), ३५१(३) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(va), ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.






