ढोकी – बार्शीहून ढोकीकडे प्रवास करणाऱ्या एका ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र (मिनी गंठण) अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी बार्शी-ढोकी बसमध्ये घडली असून, याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजश्री महेश कांबळे (वय ५८, रा. कासारवाडी रोड, बार्शी, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजश्री कांबळे या ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बार्शी-ढोकी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे, सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अलगद चोरून नेले.
बस ढोकीत पोहोचल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी ११ ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोठाळवाडी शिवारातून ३२ हजारांची पाणी मोटार लंपास
कळंब, – तालुक्यातील कोठाळवाडी शिवारातील एका विहिरीवरून अज्ञात चोरट्याने ५ हॉर्सपॉवरची पाणबुडी मोटार, स्टार्टर आणि केबल असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनंत नानासाहेब लंगडे (वय ४८, रा. कोठाळवाडी, ता. कळंब) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंगडे यांच्या भावजयीच्या मालकीचे कोठाळवाडी शिवारातील गट क्रमांक ४२० मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीवर बसवलेली ‘इकोजन’ कंपनीची ५ हॉर्सपॉवर क्षमतेची मोटार, स्टार्टर आणि २०० फूट केबल असा मुद्देमाल ८ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेला.
शेतात गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर अनंत लंगडे यांनी ११ ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये शेतीसाहित्याच्या सुरक्षेबद्दल चिंतेचे वातावरण आहे.