कुठे ते सुसंस्कृत यशवंतराव… आणि कुठे ही सत्तेच्या मस्तीतली ट्रोलधाड! महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं इतकं विदारक अधःपतन कदाचित इतिहासात कधीच झालं नसेल. एका बाजूला महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा उत्तुंग आदर्श आहे, जिथे वैयक्तिक चारित्र्यहनन करणाऱ्यालाही मोठ्या मनाने माफ करण्याचं आणि आत्मचिंतन करण्याचं धैर्य होतं. आणि दुसऱ्या बाजूला, त्याच यशवंतरावांचं नाव घेऊन राजकारण करणारी पिढी आहे, जिला आरसा दाखवणाऱ्या पत्रकारांवर अश्लील आणि घाणेरड्या कमेंट्स करण्यासाठी ट्रोलची फौज वापरावी लागते. हे चित्र महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारं आहे.
प्र. के. अत्रेंनी यशवंतरावांवर ‘निपुत्रिक’ म्हणून केलेला हल्ला हा अत्यंत वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरचा होता. पण यशवंतरावांनी काय केलं? त्यांनी अत्रेंवर चिखलफेक केली नाही, अपशब्दांचा वापर केला नाही, की कार्यकर्त्यांना अत्रेंच्या विरोधात चिथावलं नाही. त्यांनी फक्त एक फोन केला आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील वेदना शांतपणे सांगितली. त्या एका फोन कॉलमध्ये इतकं सामर्थ्य होतं की, अत्रेंसारखा स्वाभिमानी आणि परखड माणूस थेट घरी येऊन माफी मागतो, पश्चातापाचे अश्रू ढाळतो. आणि वेणूताईंचं मोठेपण तर पाहा, “भाऊ, त्या निमित्ताने तरी घरी आलात,” असं म्हणून त्या अत्रेंना माफ करतात. ही होती महाराष्ट्राची संस्कृती. ही होती त्या मातीतील माणसं, ज्यांनी वैयक्तिक अपमान गिळून राज्याचा विचार मोठा मानला.
आता धाराशिवमधील विद्यमान आमदारांच्या वर्तनाकडे पाहूया. ‘धाराशिव लाइव्ह’ या एका वेब पोर्टलने त्यांना काही रास्त प्रश्न विचारले. प्रश्न काय होते? तर तुमच्या घराण्याची ४० वर्षांची सत्ता असताना जिल्हा मागास का राहिला? विकासकामं का रखडली? तुमच्या कार्यकर्त्यांचा गुन्हेगारीत सहभाग का आहे? व्हीआयपी पास घोटाळ्यावर तुमचं मौन का? ही लोकशाहीत विचारली जाणारी अत्यंत सामान्य प्रश्नं आहेत. यावर यशवंतरावांचा आदर्श मानणाऱ्या नेत्याने काय करायला हवं होतं? पत्रकाराला बोलावून वस्तुस्थिती मांडायला हवी होती, किंवा आपल्या कामातून उत्तर द्यायला हवं होतं.
पण इथे घडलं उलटंच! प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी, आमदारांच्या कथित ट्रोल आर्मीने ‘धाराशिव लाइव्ह’च्या फेसबुक पेजवर आणि संपादकांच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक सुरू केली. अश्लील कमेंट्स, शिवीगाळ आणि बदनामीचा घाणेरडा खेळ सुरू झाला. हा थेट-थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला भ्याड हल्ला आहे. हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. जेव्हा तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसतात, तेव्हा तुम्ही प्रश्न विचारणाऱ्याचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. यशवंतरावांनी वैयक्तिक हल्ल्यानंतरही सुसंस्कृतपणा सोडला नाही आणि इथे जनतेच्या पैशांशी निगडित प्रश्न विचारल्यावर असभ्यतेचा कळस गाठला जातोय.
‘तुला चप्पलने मारतो’, ‘कानशिलात मारतो’, ‘कोथळा काढतो’ ही आजच्या राजकारणाची नवी भाषा झाली आहे. यशवंतरावांच्या महाराष्ट्रात विचारांची लढाई विचारांनीच व्हायची. आज सत्तेची गुर्मी इतकी वाढली आहे की, कोणी प्रश्न विचारला तर त्याला ट्रोलच्या झुंडीकडून अक्षरशः लिंच केलं जातं. यशवंतरावांचं नाव फक्त भाषणांपुरतं आणि त्यांच्या पुण्यातिथी-जयंतीला हार घालण्यापुरतं उरलं आहे. त्यांचे विचार आणि त्यांची सहिष्णुता सोयीस्कररीत्या विसरली गेली आहे.
धाराशिवच्या आमदारांनी आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, यशवंतराव चव्हाण होणं म्हणजे फक्त त्यांचं नाव घेणं नव्हे, तर त्यांच्यासारखं वागणं आहे. टीकेला सामोरं जाण्याचं धैर्य अंगी बाणवणं आहे. जर तुमच्यात जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची धमक नसेल, तर यशवंतरावांच्या नावाचा ढाल म्हणून वापर करून, पाठीमागून ट्रोलधाडीचं शस्त्र चालवणं बंद करा. हा यशवंतरावांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या चमच्यांची जहागीर नाही. ‘धाराशिव लाइव्ह’ सारखे पत्रकार तुम्हाला आरसा दाखवतच राहतील. तो आरसा फोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्यात दिसणारा आपला भेसूर चेहरा बदलण्याचा प्रयत्न करा, यातच तुमचं आणि राज्याचं भलं आहे!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह