धाराशिव: छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चोराखळी येथे एका कला केंद्रासमोर सोमवारी झालेल्या हल्ल्यात गोळीबार झाला नसून, दोघांना फरशीचे तुकडे, दगड आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याची माहिती प्रथम खबर अहवालातून (FIR) समोर आली आहे. येरमाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
FIR नुसार घटनेचा तपशील
पोलिसात दाखल झालेल्या FIR नुसार, ही घटना सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:३० ते ६:०० च्या दरम्यान चोराखळी शिवारातील महाकाली कला केंद्रासमोर घडली. या हल्ल्यात संदीप यल्लाप्पा भुट्टे आणि रोहीत जाधव हे दोघे जखमी झाले आहेत. तौसीफ सिकंदर तांबोळी (वय २४) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, संदीप भुट्टे यांनी सेंट्रिंगच्या कामाचे बोलण्यासाठी तौसीफ तांबोळी यांना बोलावून घेतले होते. ते सर्व जण गाडीतून महाकाली कला केंद्राजवळ आले असता, तेथे असलेल्या आरोपींनी संदीप भुट्टे आणि रोहीत जाधव यांच्यासोबत जुन्या वादातून भांडण सुरू केले.
दगड, फरशीने हल्ला
या भांडणादरम्यान, पवन पोळ याने फरशीच्या तुकड्याने, अक्षय साळुंकेने दगडाने आणि राज पवारने लाकडी दांड्याने संदीप भुट्टे यांच्या डोक्यात, पाठीवर आणि पोटावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, विजय साळुंके याने रोहीत जाधव यांना फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. याव्यतिरिक्त इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींनीही शिवीगाळ करत मारहाण केली, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी तांबोळी यांनाही हातावर मुक्का मार लागला.घटनेनंतर फिर्यादीने जखमींना गाडीत घालून उपचारासाठी धाराशिव येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले.
आरोपींची नावे
पोलिसांनी या प्रकरणी पवन पोळ, अक्षय साळुंके, राज पवार, विजय साळुंके आणि चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीच्या बातमीत गोळीबार झाल्याचे म्हटले होते, मात्र दाखल FIR मध्ये गोळीबार किंवा कोणत्याही प्रकारच्या बंदुकीचा उल्लेख नाही. येरमाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.