येरमाळा – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे एका दुकानात बेकायदेशीरपणे आणि निष्काळजीपणे साठवून ठेवलेल्या अंदाजे ३३,००० रुपये किमतीच्या फटाका साठ्यावर येरमाळा पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. या कारवाईत संपूर्ण माल जप्त करण्यात आला असून, दुकान मालकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेरखेडा येथील ‘रुद्रा फायर वर्क’ या दुकानात मोठ्या प्रमाणात विनापरवाना फटाक्यांचा साठा असल्याची माहिती येरमाळा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सदर दुकानावर छापा टाकला.
यावेळी दुकान मालक महादेव ज्ञानदेव चव्हाण (वय ४१, रा. तेरखेडा) याच्या ताब्यातून अशोक फुल झाडे, रेगाळी तोटे, चुटपुट फटाके यांसारख्या शोभेच्या फटाक्यांचे अनेक बॉक्स आढळून आले. हा सुमारे ३३,००० रुपये किमतीचा साठा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, तसेच फटाक्यांपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याची कोणतीही खबरदारी न घेता अत्यंत निष्काळजीपणे साठवण्यात आला होता.
पोलिसांनी तात्काळ सर्व फटाके जप्त केले. परवाना नसताना आणि मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी महादेव चव्हाण याच्याविरोधात भारतीय विस्फोटक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.