येरमाळा : सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर तेरखेडा पुलाजवळ एका धावत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजेश हसराजभाई काजिरिया (वय ३२, रा. देवभूमी द्वारका, गुजरात) हे आपल्या ट्रक (क्र. जी.जे. ३७ टी. ८५४८) मधून मालवाहतूक करत होते. १८ सप्टेंबर रोजी रात्री ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना तेरखेडा पुलाजवळ अज्ञात व्यक्तीने धावत्या ट्रकवर चढून मालाची चोरी केली.
या चोरीमध्ये दोन रिन वॉशिंग बॅग, एक गॅस शेगडीचा बॉक्स आणि लहान मुलांच्या खेळण्यांचे (बुलबुले) १२ नग असलेले एक कार्टुन असा एकूण २०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
या घटनेप्रकरणी ट्रकचालक राजेश काजिरिया यांनी दुसऱ्या दिवशी, १९ सप्टेंबर रोजी, येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
घरासमोर ठेवलेले ३२ हजारांचे लोखंडी चॅनेल आणि वायर लंपास
उमरगा : शहरातील पुदाले टायर्स ते साईधाम चौक रस्त्यावर घरासमोर ठेवलेले सुमारे ३२,४०० रुपये किमतीचे १८ लोखंडी चॅनेल आणि वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १६ सप्टेंबरच्या रात्री ते १७ सप्टेंबरच्या सकाळच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी विवेक अरुण देशमुख (वय ४०, रा. शिवपुरी रोड, उमरगा) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी सोमानी यांच्या घरासमोर १८ लोखंडी चॅनेल आणि ३ मीटर वायर असे साहित्य ठेवले होते.
दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने हे सर्व साहित्य चोरून नेले. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत ३२,४०० रुपये आहे.
विवेक देशमुख यांनी शुक्रवारी, १९ सप्टेंबर २०२५ रोजी, उमरगा पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.