येरमाळा : कळंब तालुक्यातील वडजी येथे हुंड्यासाठी सुनेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिताबाई पोपट हांगे (वय ४७ वर्षे, रा. रामेश्वरवाडी हांगेवाडी, ता. केज, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी पल्लवी हिचे लग्न वडजी येथील विशाल निवृत्ती जाधवर याच्याशी झाले होते. १३ डिसेंबर रोजी त्या पल्लवीला सासरी सोडण्यासाठी वडजी येथे गेल्या असताना सासरच्या मंडळींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. विशाल जाधवर, बाळुबाई जाधवर, निवृत्ती जाधवर, प्रतीक मोराळे, राजेंद्रकालीदास मोराळे, अजय मोराळे, समाधान वाघमारे आणि भागाबाई मोराळे यांनी लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई, वीट आणि नोझल पाईपाने मारहाण करून सिताबाई यांना जखमी केले.
एवढेच नव्हे तर सिताबाई यांचे पती आणि मुलगी पल्लवी यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी सिताबाई यांच्या जीपवर दगड मारून गाडीचा काच फोडला. त्यामुळे ३०,००० रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३२४(२), ३५२, १८९(२), १९१(१), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.