येरमाळा – कळंब तालुक्यातील प्रसिद्ध येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा दिनांक ९ एप्रिल २०२५ ते १८ एप्रिल २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. यात्रेदरम्यान, विशेषतः १२ आणि १३ एप्रिल रोजी पालखी मिरवणूक, चुनखडी वेचणे आणि पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र व इतर राज्यांतून लाखो भाविक येरमाळामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, जिल्हा प्रशासनाने ११ एप्रिल २०२५ ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीसाठी येरमाळ्याकडे येणाऱ्या मार्गांवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल केले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या अहवालानुसार, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे निर्देश जारी केले आहेत.
वाहतूक बदल तपशील:
-
कालावधी: दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री ००:०१ पासून ते १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत.
-
निर्बंध: सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना (Heavy Vehicles) खालील मार्गांवर प्रवेश मनाई असेल:
- छत्रपती संभाजीनगर → येरमाळा → कुसळंब → बार्शी
- बार्शी → कुसळंब → येरमाळा → छत्रपती संभाजीनगर
- कळंब → येरमाळा → कुसळंब → बार्शी
- बार्शी → कुसळंब → येरमाळा → कळंब
- बार्शी → कुसळंब → येरमाळा → परळी/परभणी
- परभणी/परळी → येरमाळा → कुसळंब → बार्शी
- कळंब → येरमाळा → छत्रपती संभाजीनगर
- छत्रपती संभाजीनगर → येरमाळा → कळंब
-
पर्यायी मार्ग: अवजड वाहनांसाठी खालील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत:
- छत्रपती संभाजीनगर ते बार्शी: येरमाळा उड्डाण पुलावरून → येडशी मार्गे → बार्शी.
- बार्शी ते छत्रपती संभाजीनगर: बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → येरमाळा उड्डाण पुलावरून मार्गे → छत्रपती संभाजीनगर.
- कळंब ते बार्शी: कळंब → मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) → दहीफळ → येडशी → पांगरी → कुसळंब मार्गे → बार्शी.
- बार्शी ते कळंब: बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → दहीफळ → मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) मार्गे → कळंब.
- बार्शी ते परळी/परभणी: बार्शी → कुसळंब → पांगरी → येडशी → ढोकी → कळंब मार्गे → परळी/परभणी.
- परभणी/परळी ते बार्शी: परभणी/परळी → कळंब → ढोकी → येडशी → पांगरी → कुसळंब मार्गे → बार्शी.
- कळंब ते छत्रपती संभाजीनगर: कळंब → मनुष्यबळपाटी → मांडवा → वाशी फाटा मार्गे → छत्रपती संभाजीनगर.
- छत्रपती संभाजीनगर ते कळंब: वाशी फाटा → मांडवा → मनुष्यबळपाटी मार्गे → कळंब.
-
अपवाद: हे निर्बंध पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, हलकी वाहने (Light Vehicles) आणि एस.टी. बसेस यांना लागू राहणार नाहीत.
भाविकांनी आणि वाहन चालकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.