परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे प्रेमसंबंधाच्या कारणावरून १८ वर्षीय तरुणावर अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, आता या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित सात आरोपी अद्याप फरार आहेत.
खुनाचा गुन्हा दाखल, आरोपींना पोलीस कोठडी
या प्रकरणी अंबी पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल होता. मात्र, माऊली गिरीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सतीश जगताप (रा. पांढरेवाडी), राहुल मोहिते (रा. पांढरेवाडी, परंडा), आकाश मगर (रा. शेळगाव, परंडा) आणि विजय पाटील (रा. सोनारी, परंडा) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर सात आरोपी अद्याप फरार
या हल्ल्यात सहभागी असलेले इतर सात आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली असून, लवकरच उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपास सुरू
या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष खरड आणि पीएसआय ज्ञानेश्वर घाटगे करत आहेत. खुनाच्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.