तुळजापूर: तालुक्यातील काक्रंबा येथे बोअरच्या पाईपने आंघोळ करण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून एका २३ वर्षीय तरुणाला आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम कुमार देवकते (वय २३, रा. काक्रंबा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काक्रंबा येथील खंडोबा मंदिरासमोर घडली. शुभम देवकते हे अशोक देवगुडे यांच्या घरासमोर असताना, आंघोळीच्या कारणावरून त्यांचा वाद झाला.
यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शुभम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन आरोपींनी त्याला लाथाबुक्यांनी, लाकडी फळीने आणि विटांनी मारहाण करून जखमी केले. तसेच, त्याला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी शुभम देवकते यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाश नंदकुमार देवगुंडे, नंदकुमार हनुमंत देवगुंडे, प्रसाद नंदकुमार देवगुंडे, आण्णा हनुमंत देवगुंडे, स्वाती आण्णासाहेब देवगुंडे, कालीदास रावसाहेब खताळ, रेणुका नंदकुमार देवगुंडे आणि धागाबाई मारकड (सर्व रा. काक्रंबा) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 191(3), 190) गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.