भूम: मागील भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काचेच्या बाटलीने मारहाण केल्याची घटना भूम तालुक्यातील जयवंत फाटा येथे घडली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश बळीराम सकुंडे (वय ४३, रा. राळेसांगवी, ता. भूम) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी १६ डिसेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अविनाश सकुंडे हे जयवंत फाटा येथील हॉटेल साई समोर होते. त्यावेळी आरोपी सूर्यकांत निवृत्ती टाळके (रा. राळेसांगवी, ता. भूम) याने मागील भांडणाचे कारण पुढे करून अविनाश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यावर आरोपीने अविनाश यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच काचेची बाटली मारून जखमी केले. यावेळी “तू गावात कसा राहतो, तेच बघतो,” अशी धमकीही आरोपीने दिली.
अविनाश सकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सूर्यकांत टाळके विरुद्ध भूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (स्वेच्छेने दुखापत करणे), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.






