धाराशिव: शहरातील कुरणे नगर भागात एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी खिल बाळासाहेब बनसोडे (वय ३३, रा. सावित्रीबाई फुले सोसायटी, नागनाथ मंदिर रोड, धाराशिव) हे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास कुरणे नगर येथे आपल्या आईशी काही कारणावरून भांडत होते.
त्यावेळी आरोपी दिनू पारधी, सावंतबाई आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. कुरणे नगर, धाराशिव) यांनी तिथे येऊन फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी बनसोडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, आरोपींनी उलट्या कुऱ्हाडीने हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले.
उपचारानंतर खिल बनसोडे यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(१)(२), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






