बेंबळी : शेतामध्ये काम करण्याच्या बहाण्याने बोलावून एका ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गावातीलच एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. गावातील एका तरुणाने पीडित महिलेला शेतात काम आहे असे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर शेतातील लिंबाच्या झाडाखाली आरोपीने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडित महिलेने २८ जुलै रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम-६४ (लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार (कलम ३(१)डब्ल्यू(i)(ii), ३(२)(व्हीए)) गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. पीडित महिलेची आणि गावांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.