आंबी: एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून, झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर पीडित मुलीने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गावातीलच एका तरुणावर लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित १७ वर्षीय मुलीने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी ती घरी एकटी असताना गावातीलच एका तरुणाने तिला आपल्या घरी नेले. तिथे, ‘तुला खर्चासाठी पैसे देतो, तू गप्प बस,’ असे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी तरुणाने पीडितेवर दबाव टाकत, “जर हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडिता प्रचंड घाबरली होती आणि तिने इतके दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
अखेर, पीडितेने धाडस दाखवून आंबी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई केली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणावर भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३५१(२), ३५१(३) सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम ४, ८, १२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (Atrocities) कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आंबी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
(कायद्यानुसार पीडितेचे नाव आणि गावाची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.)