मुरुम (ता. उमरगा): दुचाकीवरून जाणाऱ्या तीन मित्रांना अडवून तिघा अज्ञात इसमांनी शिवीगाळ करत पट्ट्याने व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मुरुम परिसरातील नाईकनगर शिवारात घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ चाँद शेख (वय २१, रा. हमीद नगर, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. आसिफ आणि त्याचे मित्र किरण व शहानवाज हे तिघे दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. ते नाईकनगर शिवारात आले असता, अचानक तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले.
आरोपींनी दुचाकीवर मागे बसलेल्या शहानवाज याला खाली ओढून पाडले. त्यानंतर फिर्यादी आसिफ शेख याला काठीने व पट्ट्याने उजव्या व डाव्या हातावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर आसिफ शेख यांनी दि. २३ जानेवारी २०२६ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.






