तुळजापूर: अधिक मासानिमित्त श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांची फसवणूक करणाऱ्या आणि अनधिकृतपणे पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन भामट्यांवर मंदिर प्रशासनाच्या विशेष पथकाने आज मोठी कारवाई केली. अमर वसंतराव शेळके आणि रवी दत्तात्रय शिरसाट अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, त्यांना पुढील कारवाईसाठी तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी आणि धार्मिक विधींसाठी येत आहेत. भाविकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांना अधिकृत पुजाऱ्यांकडूनच योग्य धार्मिक सेवा मिळावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने एक विशेष भरारी पथक तैनात केले आहे. या पथकात सहायक व्यवस्थापक (धार्मिक), सुरक्षा निरीक्षक, ‘एसआयएसपीएल’चे सुरक्षा पर्यवेक्षक आणि मंदिर संस्थानच्या दोन शिपायांचा समावेश आहे. हे पथक मंदिर परिसरात २४ तास गस्त घालत आहे.
अशी झाली कारवाई…
-
संशयास्पद हालचाली: आज सकाळी हे पथक मंदिर परिसरात पाहणी करत असताना अमर शेळके आणि रवी शिरसाट हे दोघे भाविकांना धार्मिक विधीचे आमिष दाखवून अनधिकृतपणे पुजारी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले.
-
नियमांचे उल्लंघन: हे दोघेही मंदिर प्रशासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत होते. त्यांच्या या कृत्यामुळे मंदिरातील शिस्त आणि एकूणच व्यवस्थापनाला मोठी बाधा निर्माण होत होती.
-
पोलिसांत रवानगी: पथकाने तात्काळ या दोन्ही बोगस पुजाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी थेट तुळजापूर पोलीस ठाण्यात केली.
“भाविकांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. मंदिर परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला शिस्तबद्ध वातावरणात दर्शन मिळावे, यासाठी आमचे पथक सक्रिय आहे. अधिकृत पुजाऱ्यांकडूनच भाविकांनी विधी करून घ्यावेत.” — मंदिर प्रशासन, तुळजापूर
या कारवाईमुळे मंदिर परिसरातील बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या आणि शिस्तीच्या दृष्टीने उचललेल्या या पावलाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.

