धाराशिव : धाराशिव-येरमाळा रस्त्यावरील गडदेवदरी पाटीसमोर रस्ता ओलांडत असलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाला भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महमुद खुदबुद्दीन मुजावर (वय ८०, रा. कुमाळवाडी, ता. जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमुद मुजावर हे शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) सकाळी ९ वाजेच्या सुमारास गडदेवदरी पाटीसमोर धाराशिव ते येरमाळा रोडवरून रस्ता ओलांडून पलीकडे जात होते. याच वेळी महिंद्रा सुप्रो एलएक्स (क्र. एमएच २५ आर ९२३६) या वाहनाच्या चालकाने आपले वाहन अतिवेगाने, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडत असलेल्या महमुद मुजावर यांना जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर इरफान तैयब मुजावर (वय २६, रा. कुमाळवाडी) यांनी शनिवारी (ता. ४ एप्रिल) धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या अपघाताची तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी महिंद्रा सुप्रो चालकाविरुद्ध नवीन फौजदारी कायदा म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६ (१) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या अपघाताचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.





