धाराशिव – आरोग्य विभागातील पॅरामेडिकल वर्कर (कंत्राटी) नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय 50) यांना 15 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सेंट्रल बिल्डिंग, धाराशीव येथे करण्यात आली.
तक्रारदार हा लोहारा येथील पॅरामेडिकल वर्कर (कुष्ठरोग) पदावर कार्यरत आहे. तक्रारदाराचे फेब्रुवारी व मार्च 2025 चे पगार व 2023-24 मधील टी.ए. बिल प्रलंबित होते. आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने संबंधित पगार व टी.ए. बिल काढून देण्यासाठी डॉ. कोरे व सांखिकी सहाय्यक माळी यांच्याकडून बिल मंजूर करून देण्याचे आश्वासन देत 25,000 रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रार पडताळणी करताना आरोपीने पंचांसमक्ष 27,000 रुपये मागणी केल्याचे सिद्ध झाले. तडजोडीनंतर 15,000 रुपये लाच स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. आज कारवाई दरम्यान नरसिंग सूर्यवंशी याने तक्रारदाराकडून 15,000 रुपये स्वीकारले असता, लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
आरोपीकडून मिळालेल्या वस्तू
- लाच रक्कम: 15,000 रुपये
- चांदीची अंगठी (5 ग्रॅम)
- अतिरिक्त रोख रक्कम: 300 रुपये
- विवो कंपनीचा मोबाईल
आरोपीची घरझडती आणि पुढील तपास
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीची घरझडती सुरू केली असून, त्याचे मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 अ अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.
सापळा पथकातील अधिकारी
- सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक विकास राठोड (ला.प्र.वि. धाराशीव)
- पर्यवेक्षण अधिकारी: पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे
- मार्गदर्शक अधिकारी: पोलीस अधीक्षक संदीप आटोळे
- अतिरिक्त पोलीस अधीक्षक: मुकुंद आघाव
तक्रार नोंदणीसाठी संपर्क
भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 किंवा पोलीस अधीक्षक (ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर) 9923023361 आणि पोलीस उप अधीक्षक 9594658686 वर संपर्क साधावा.