महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापुरात गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्जचा घाणेरडा खेळ राजरोसपणे सुरू होता. पोलिसांच्या आशीर्वादाने आणि राजकीय छत्रछायेखाली “एम.डी.” या घातक अंमली पदार्थाची खुलेआम विक्री सुरू होती. या पवित्र नगरीत जवळपास १५०० तरुण या नशेत बुडाले होते.
ड्रग्ज साम्राज्याच्या सूत्रधारांची नावे:
- विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
- चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
- शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
- विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – माजी सभापती यांचा मुलगा
हे सर्वजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे उघडकीस आले आहे. राजकीय आणि पोलिसांमधील साटेलोट्यामुळे या टोळक्याने तुळजापुरात ड्रग्जचे साम्राज्य उभारले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर आणि आरोपीचे साटेलोटे होते. त्यांनीच या आरोपीना आजवर पाठीशी घातले होते.
तुळजापूर तालुक्यात तामलवाडीजवळ १५ फेब्रुवारी २०२५ रोजी धाराशिव स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन भारत कासार यांनी केलेल्या कारवाईत अमित उर्फ चिम्या अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४५ ग्रॅम वजनाचा, २.२५ लाख रुपये किंमतीचा “एम.डी.” अंमली पदार्थ आणि ७.५० लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी ३ जण अटकेत, १० जण कारागृहात आहेत, तर १२ आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींमध्ये सर्व बडे राजकीय लोक आहेत. परंतु, पोलिसांकडून त्यांच्या अटकेसाठी कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.
तुळजापुरातील ड्रग्ज साम्राज्यावर हातोडा का पडत नाही? भाजपच्या या माजी नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना अटक का होत नाही ? यामागे कोणाचे वरदहस्त आहे?
ड्रग्ज विक्रीत गुंतलेल्या या राजकीय व्यक्तींवर कडक कारवाई होणार की पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने या टोळक्याचा सुळसुळाट सुरूच राहणार? तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ड्रग्जच्या नशेचा किडा आणखी किती काळ फोफावणार?
भाजपचे राजकीय नेते आणि पोलिसांचे आशीर्वाद – ड्रग्जचा बाजार खुलेआम फुलत राहणार का?