तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून, यातील महत्त्वाच्या कामांसाठी तातडीने निधी वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
विकास आराखड्याची प्रमुख वैशिष्ट्ये
आराखड्यातील महत्त्वाच्या बाबींमध्ये तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, यासाठी स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाईन दर्शन व्यवस्था, वाहतूक सुविधा, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची सेवा, शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा व्यवस्थापन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अशा विविध उपाययोजना आराखड्यात समाविष्ट आहेत.
मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याचे जतन करून पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास व नवीन सुविधा उभारण्याचे काम या आराखड्याच्या अंमलबजावणीतून होणार आहे. मंदिर परिसराच्या सुरक्षा व टेहाळणी व्यवस्थेमध्ये सुधारणा, वातानुकूलन यंत्रणा, डिजिटल पद्धतीने मार्गदर्शन आणि माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तुळजापूर हेरिटेज टूर
तुळजापूर हेरिटेज टूर विकसित करण्याचा प्रस्ताव आराखड्यात आहे. यामध्ये अष्टतीर्थ भेट व दर्शन, रामदरा तलावाच्या डोंगरावर भवानी तलवार देतानाचे १०८ फूट उंचीचे शिल्प, शिव उद्यान, लाइट अँड साऊंड शो, रामदरा तलावात बोटिंगची सुविधा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
निधी व भूसंपादन
तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी १८६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण ७३ एकर भूखंडाचे संपादन आवश्यक असून, मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याची सूचना केली.. मंदिराचे जीर्णोद्धार कार्य पुढील ५०० वर्षे अबाधित राहील अशा दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या
दोन वर्षांत पूर्णत्वाकडे
मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आराखड्यातील कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या कामांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केली आहे.
भवानी शंकर मंडपासमोरील ऐतिहासिक स्तंभांचे पुनरबांधणी
मंदिराच्या पुनरबांधणीमध्ये भवानी शंकर मंडपासमोरील काही ऐतिहासिक स्तंभ बदलावे लागणार आहेत. या स्तंभांवरील कलाकृतीचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्तंभांवरील कोरीव काम ८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शारदीय नवरात्र महोत्सवानंतर हे स्तंभ जागेवर आणून मंदिराचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.